Thursday, October 1, 2026
spot_img
Home रत्नागिरी पाली अपघात प्रकरणातील ‘त्या’ मोटार चालकाविरुद्ध गुन्हा

पाली अपघात प्रकरणातील ‘त्या’ मोटार चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- पाली येथून रत्नागिरीकडे येणाऱ्या दुचाकीला मागून भरधाव ओरा मोटारीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली होती. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांत रमेश नेर्लेकर (वय ३८, रा. सी वॉर्ड, सिद्धार्थनगर, बाबा ग्रुपजवळ, जुना बुधवारपेठ, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे संशयित मोटार चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २८) सकाळी साडेअकराच्या सुमारास जोशीवाडी येथील सबुरी हॉटेल व लॉजसमोरील पेट्रोलपंपाजवळ घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर गुणाजी बारे (वय ५२, रा. पाली बाजारपेठ रत्नागिरी) हे त्यांची पत्नी मिनल यांना सोबत घेऊन दुचाकीवरून पाली येथून रत्नागिरीच्या दिशेने निघाले होते. जोशीवाडी येथील पेट्रोलपंपाजवळ ते पेट्रोल भरण्यासाठी महामार्गावरून वळत असताना त्यांच्या मागून येणाऱ्या मोटारीने चालक सुशांत नर्लेकर यांनी वाहन भरधाव वेगाने चालवून दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात मनोहर बारे यांचा मृत्यू झाला तर मिनल गंभीर जखमी झाली होती. या प्रकरणी अभिजित मनोहर बारे (वय २४, रा. पाली बाजारपेठ) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.