चंपक मैदानावर पक्षीप्रेमींची गर्दी
रत्नागिरी:- हिवाळ्याची चाहूल लागताच कोकणात परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असून, महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या युरोपियन ‘पांढऱ्या करकोच्या’चे रत्नागिरी तालुक्यात प्रथमच दर्शन घडले आहे. गेल्या चार दिवसांपासून या परदेशी पाहुण्याने रत्नागिरी शहरातील चंपक मैदानावर मुक्काम ठोकला असून, त्याला पाहण्यासाठी स्थानिक पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांनी मैदानावर मोठी गर्दी केली आहे.
मूळचा युरोप, मध्य आशिया आणि पश्चिम आशियातील रहिवासी असलेला हा करकोचा तेथील कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी हजारो किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास करून नोव्हेंबर महिन्यात भारतीय उपखंडात स्थलांतर करतो आणि फेब्रुवारी ते मार्चदरम्यान पुन्हा आपल्या मूळ अधिवासाकडे परतीचा प्रवास सुरू करतो. भारतात प्रामुख्याने गुजरात, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यांतील पाणथळ जागा, तलाव, दलदलीचा प्रदेश, गवताळ कुरणे व शेतीच्या मैदानांत या पक्ष्याचे वास्तव्य पाहायला मिळते; मात्र महाराष्ट्रात त्याचे दर्शन अत्यंत क्वचितच होते. गतवर्षी देवरूख आणि चिपळूण येथे हा पक्षी पाहण्यात आला होता, तर यंदा रत्नागिरी तालुक्यात त्याची ही पहिलीच नोंद ठरल्याची माहिती पक्षीमित्र अक्षय तोंडवळकर यांनी दिली आहे. कोकणातील अनुकूल वातावरण आणि मुबलक खाद्य यामुळे हा दुर्मीळ पाहुणा रत्नागिरीत रमल्याचे चित्र दिसत असून, रत्नागिरीच्या जैवविविधतेच्या दृष्टीने हे वास्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.









