अपघातात चालकासह नऊ जण जखमी
देवरूख:- मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाट येथील साखरपा गोवरेवाडी बस स्टॉपसमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक देऊन अपघात घडवल्याप्रकरणी धाराशिव-लांजा एसटी बसच्या चालकावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास घडलेल्या या अपघातात एसटी चालक, वाहक आणि प्रवासी असे एकूण नऊ जण जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी तोंडवली बोभाटेवाडी (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील रहिवासी असलेले टेम्पो चालक रामचंद्र बोभाटे (वय ५२) यांनी देवरूख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोभाटे हे आपल्या ताब्यातील आयशर टेम्पोमध्ये (क्र. एमएच ०७ एजे ६५५८) कराड येथील पिडीलाईट कंपनीतून रोफ टाईल्स पावडरच्या गोण्या भरून रत्नागिरीच्या दिशेने म्हापसा (गोवा) येथे निघाले होते. पहाटे साखरपा गोवरेवाडी बस स्टॉपसमोर आले असता त्यांच्या टेम्पोचा डाव्या बाजूचा पुढील टायर पंक्चर झाला. त्यामुळे त्यांनी टेम्पो रस्त्याच्या डाव्या बाजूला कडेला सुरक्षितपणे उभा करून सर्व इंडिकेटर सुरू ठेवले होते आणि ते टेम्पोमध्ये बसले होते. याच दरम्यान धाराशिव ते लांजा अशी प्रवास करणारी एसटी बस (क्र. एमएच १४ एमएच ४८३५) आंबा घाटातील उतारावरून येत होती. रस्ता उताराचा असतानाही आरोपी एसटी चालकाने बस वेगात, हयगयीने आणि धोकादायकपणे चालवून उभ्या टेम्पोच्या मागील उजव्या बाजूला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत स्वतः एसटी चालक जितेंद्र संभाजी पाटील (वय ४१, सध्या रा. माउलीनगर, लांजा, जि. रत्नागिरी, मूळ रा. कुर्ली, ता. चिकोडी, जि. बेळगाव), रोकडेश्वर पिराजी तोटेवाड (रा. लांजा, मूळ रा. मंगल सांगवी, ता. कंधार, जि. नांदेड), फुलाजी मारुती बत्तलवाड (रा. लांजा), वैष्णवी मारुती बत्तलवाड, कृष्णा मारुती बत्तलवाड, अनन्या मारुती बत्तलवाड, दिनेश रामचंद्र जोगळे (रा. ओझरे, ता. संगमेश्वर), यशवंत धोंडिबा रानगे (रा. लांजा) आणि अंकुश विलास शिंदे (रा. लांजा) हे नऊ जण किरकोळ व गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. याप्रकरणी रामचंद्र बोभाटे यांच्या तक्रारीवरून देवरूख पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक १७३/२०२६ नुसार आरोपी एसटी चालक जितेंद्र संभाजी पाटील याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून देवरूख पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









