संगमेश्वर:- तालुक्यातील कुळ्ये, साळवीवाडी येथील नवीन नवलाई मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर ठेवलेली दानपेटी फोडून रोख रक्कम आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर अज्ञाताने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०० ते २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान घडली. अज्ञाताने मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर असलेल्या स्टीलच्या दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील अंदाजे २,००० रुपयांची रोख रक्कम लांबवली. तसेच, चोरीचा सुगावा लागू नये म्हणून मंदिरातील ७,५०० रुपये किमतीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा जुना डीव्हीआर आणि हार्ड डिस्क देखील चोरून नेली. या घटनेत एकूण ९,५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
चालू नवरात्रोत्सवासाठी कुळ्ये गावातील मुंबई मंडळाचे सदस्य गावी आले असता या घटनेबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर तक्रारदार अनिल राजाराम साळवी (वय ६४, रा. कुळ्ये साळवीवाडी, हल्ली रा. घाटकोपर, मुंबई) यांनी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात उशिराने तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या खबरीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ व ३३४(१) अन्वये गुन्हा नोंदवला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.









