Friday, October 16, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मावशीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप, भाचीवर अत्याचार; तरुणाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा

मावशीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप, भाचीवर अत्याचार; तरुणाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा

रत्नागिरी:- शहरात विश्वासाचा घात करणारी आणि नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. मावशीसोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या एका तरुणाने तिच्यासोबत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विश्वासघात करत तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ‘तू काम करून थकली आहेस, थोडा वेळ विश्रांती घे’ असा बनाव रचून तरुणाने पीडित मुलीला एका ठिकाणी नेले आणि तिच्या इच्छेविरुद्ध हे कृत्य केले. या घटनेमुळे रत्नागिरी परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलगी डिसेंबर २०२५ पासून तिच्या मावशीकडे राहण्यासाठी आली होती. तिचा मावशीचा जोडीदार, आरोपी राज मनोज घोरपडे हा गेल्या पाच वर्षांपासून तिच्या मावशीसोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये एकत्र राहत होता. त्यामुळे त्यांच्यात कौटुंबिक ओळख होती. आरोपी हा मुलीला क्लाससाठी येण्या-जाण्यासाठी सोडत असे.

​दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास आरोपीने ​’तू काम करून थकली आहेस, थोडा वेळ आराम कर​’ असे सांगून मुलीला​ एका लॉजमध्ये नेले. तिथे एका खोलीत त्याने अल्पवयीन मुली​वर अत्याचार केले.एवढ्यावरच न थांबता, जर तू याबद्दल कोणाला काही सांगितलेस, तर मी तुझे रेकॉर्डिंग व्हायरल करीन,अशी थेट धमकी देऊन तिचे तोंड बंद ठेवण्याचा प्रयत्न केला.

या सर्व घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने धैर्याने पुढे येत पोलिसांत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पास्को​ कायद्यासह संबंधित गंभीर कलमांन्वये रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा​ दाखल करण्यात आला. हा गुन्हा ऑनलाईन पद्धतीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याकडे प्राप्त झाल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार दाखल करून घेण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका देसाई करत आहेत.