Friday, October 16, 2026
spot_img
Home गुन्हेगारी टेरवमध्ये मोबाईल टॉवरच्या कामासाठी वीजचोरी

टेरवमध्ये मोबाईल टॉवरच्या कामासाठी वीजचोरी

महावितरणच्या भरारी पथकाची धाड

चिपळूण:- तालुक्यातील टेरव येथे मोबाईल टॉवरच्या उभारणीच्या कामासाठी महावितरणच्या विद्युत वाहिनीवरून थेट आकडा टाकून अनधिकृत वीजजोडणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी सकाळी १०.५० वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या चिपळूण विभागीय कार्यालयातील भरारी पथकाने पाहणी केली असता हा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, दंडाची रक्कम न भरल्यास भारतीय विद्युत कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणात टेरव येथे कार्यरत असलेले वायरमन यांच्याविरोधातही ग्रामस्थांनी तक्रार दिल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

टेरव येथील पिकअप शेडजवळ मोबाईल कंपनीच्या टॉवर उभारणीचे काम सुरू होते. महावितरणच्या भरारी पथकाने सकाळी १०.५० वाजता घटनास्थळी पाहणी केली असता, टेरव येथील गट क्रमांक १२५/३ मध्ये संतोष विश्राम म्हालीम यांच्या जागेत हे काम सुरू असल्याचे आढळले. टॉवरच्या ठिकाणी सिंगल फेज वेल्डिंग मशीनच्या साहाय्याने वेल्डिंगचे काम सुरू होते. तसेच लहान हँड ग्राइंडरही सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

यावेळी संबंधित ठिकाणी महावितरणचे विद्युत मीटर आढळून आले नाही. त्यानंतर अधिक तपासणी केली असता, टेरव पिकअप डीपीपासून असलेल्या नवव्या विद्युत खांबावरील सर्व्हिस पोलवरून थेट आकडा टाकून वीजजोडणी केल्याचे आढळले. भरारी पथकाने केलेल्या चौकशीत ही अनधिकृत वीजजोडणी १३ ऑक्टोबर रोजी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार महावितरणकडून संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या घटनेचा भरारी पथकाने पंचनामा केला असून, साक्षीदार म्हणून रिया राकेश म्हालीम आणि राकेश संतोष म्हालीम यांनी त्यावर सह्या केल्या आहेत. भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार दंडात्मक रक्कम न भरल्यास संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात टेरव येथे कार्यरत असलेले वायरमन यांच्याविरोधातही ग्रामस्थांनी महावितरणकडे तक्रार दाखल केली आहे. १३ ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांनी मालप यांच्याकडे या वीजजोडणीबाबत विचारणा केली असता, महावितरणकडून तात्पुरते मीटर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी भरारी पथकाच्या पाहणीदरम्यान घटनास्थळी कोणतेही विद्युत मीटर आढळले नसल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर वायरमन यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सविता बाळकृष्ण कदम यांनी निवेदनाद्वारे महावितरणकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता महावितरणकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

महावितरणच्या भरारी पथकाचे प्रमुख तथा अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिलकुमार डोंगरे, सहाय्यक अभियंता राजेंद्र रासकर, प्रवीण फाळके आणि अक्षय जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.