भंगार व्यावसायिकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राऊंड परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना, पोलिसांना एक संशयास्पद दुचाकी मिळून आली. याप्रकरणी पोलिसांनी भंगार व्यावसायिकावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल निलेश शिवराम शिंगवे हे दि. ३ जून रोजी दुपारी परिसरात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, सायंकाळी ४:४५ च्या सुमारास त्यांना साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राऊंड परिसरातील एका भंगार दुकानात नंबर प्लेट नसलेली, सिल्व्हर रंगाची एक ‘ॲक्सेस’ दुचाकी दिसली.
पोलिसांनी दुकानातील भंगार व्यावसायिक रियाज फारुख अफराज (वय २१, रा. स्टेट बँक कॉलनी, रत्नागिरी) याला सदर दुचाकीबाबत विचारणा केली. मात्र, त्याच्याकडे गाडीची कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नव्हती. विचारपूस केली असता, त्याने पोलिसांना असमाधानकारक आणि उडवाउडवीची उत्तरे दिली.
दुचाकीच्या मालकीबाबत ठोस पुरावा न मिळाल्याने पोलिसांनी ५ हजार रुपये किमतीची ही दुचाकी जप्त केली आहे. या गाडीचा चेसिस नंबर MB8CF4CAAB8166444 असा असून इंजिन नंबर Q486-527392 असा आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८०/२०२६, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.









