गोखले नाका परिसरात वृद्धाचा चक्कर येऊन मृत्यू

राधाकृष्ण नाका परिसरातील घटनेने हळहळ

रत्नागिरी:- शहरातील राधाकृष्ण नाका परिसरातील रहिवासी असलेले रमाकांत महादेव माळवदे (वय ८३ वर्षे) यांचा मंगळवारी दुपारी चक्कर येऊन खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गोखले नाका येथील एका दुकानात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रमाकांत माळवदे यांचे मंगळवारी सकाळपासून पोट खराब असल्याने त्यांना अस्वस्थ वाटत होते. दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास ते दूध आणण्यासाठी राधाकृष्ण नाका येथील आपल्या राहत्या घरातून गोखले नाका येथील संसारे यांच्या दुकानात गेले होते.

दुकानात असतानाच त्यांना अचानक चक्कर आल्यासारखे वाटू लागले. ही बाब लक्षात येताच दुकानदाराने त्यांना बसण्यासाठी टेबल दिले आणि पिण्यासाठी पाणीही दिले. मात्र, त्याच वेळी माळवदे यांना पुन्हा चक्कर आली आणि ते जागीच कोसळले.

​घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. माळवदे यांची कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहून त्यांना रिक्षाने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून सायंकाळी ४ वाजता ‘उपचारापूर्वीच मयत’ घोषित केले.

​या घटनेची माहिती त्यांच्या नातवाने दिल्यानंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.