रत्नागिरीः– रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील महिला वॉर्डमध्ये शस्त्रक्रिया झालेल्या एका महिला रुग्णाला उलटी झाल्यानंतर, तेथील कर्मचाऱ्यांनी ती उलटी त्याच रुग्णाकडून साफ करून घेतल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. या संतापजनक प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनाने सुरू केलेल्या चौकशीअंती संबंधित कृत्य करणाऱ्या कर्मचारी पूर्वा सुतार यांचे नाव उघड झाले असून, त्यांनी प्रशासनाकडे लेखी माफीनामा सुपूर्द केला आहे. तसेच, संबंधित कंत्राटदार कंपनी ‘बीव्हीजी’ने त्यांना अंतिम इशारा दिला आहे.
या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, संगीता मनोहर पवार या महिला रुग्णावर काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांना पुढील उपचारांसाठी महिलांच्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास संगीता पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना वॉर्डमध्येच उलटी झाली. त्यावेळी तिथे कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी पूर्वा सुतार यांनी संवेदनशीलतेची सर्व हद्द पार करत संगीता पवार यांनाच ती उलटी साफ करण्यास भाग पाडले.
रुग्णाचे पती मनोहर पवार यांनी या प्रकाराबाबत तेथील कर्मचाऱ्यांकडे जाब विचारला असता, ‘आमच्याकडे सध्या हाऊसकिपिंगचा स्टाफ उपलब्ध नाही, त्यामुळे आम्ही रुग्णांकडूनच साफसफाई करून घेतो’, असे बेजबाबदार उत्तर त्यांना देण्यात आले होते.
ह्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या प्रकरणाचे वृत्त प्रसिद्ध होताच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आणि आरोग्य वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. या वृत्ताची गंभीर दखल घेत रुग्णालय प्रशासनाने तातडीने संबंधित वॉर्डमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी सुरू केली. या चौकशीदरम्यान हे अमानुष कृत्य पूर्वा सुतार नावाच्या कर्मचाऱ्याने केल्याचे निष्पन्न झाले.
प्रशासनाने कसून चौकशी केली असता, पूर्वा सुतार यांनी आपल्याकडून हे कृत्य घडल्याची कबुली दिली. त्यांनी लेखी माफीनामा लिहून देताना, ‘यापुढे माझ्याकडून अशी गंभीर चूक कधीही होणार नाही, आणि असे पुन्हा घडल्यास प्रशासनाने माझ्यावर कायदेशीर कारवाई करावी’, असे नमूद केले आहे.









