रत्नागिरी:- बावनदी येथील जुन्या पुलावरून नदीत उडी घेतलेल्या रेवाळेवाडी (ता. संगमेश्वर) येथील महेश नारायण भरणकर (वय ४२) याचा दुसऱ्या दिवशीही कसून शोध सुरू होता; मात्र सायंकाळपर्यंत त्याचा ठावठिकाणा लागला नसल्याने नातेवाइकांची चिंता वाढली आहे.
संगमेश्वरचे पोलिस निरीक्षक मितीश केणी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी, स्थानिक पोलिसपाटील आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने नदीपात्र व आजूबाजूच्या परिसरात दिवसभर शोधमोहीम सुरू होती; मात्र सायंकाळपर्यंत कोणतेही यश हाती आले नाही. दरम्यान, या घटनेबाबत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित घटनेची अद्याप अधिकृत नोंदच झालेली नाही. बावनदीवरील जुना पूल नेमका संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो की, रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या, याबाबत संभ्रम असल्याने गुन्हा किंवा घटनेची नोंद कोणत्या पोलिस ठाण्यात करायची, यावर अनिश्चितता निर्माण झाल्याचे समजते.
प्रत्यक्षात संगमेश्वर पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असून, बेपत्ता युवकाचा शोध लागेपर्यंत प्रयत्न सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे बावनदी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बेपत्ता महेश भरणकर याचा लवकरात लवकर शोध लागावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.









