Friday, May 15, 2026
spot_img
Home रत्नागिरी ‘जनशताब्दी एक्स्प्रेस’चा एक डबाच गायब

‘जनशताब्दी एक्स्प्रेस’चा एक डबाच गायब

रत्नागिरी:- कोकण मार्गावरुन धावणाऱ्या सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसच्या बुधवारी धावलेल्या फेरीदरम्यान एक डबा जोडलाच गेला नाही. यामुळे आरक्षित तिकिटधारकांचा गोंधळ उडाला. आयत्यावेळी डीएल-१ डबाच उपलब्ध न झाल्याने प्रवाशांवर इतर डब्यातून प्रवास करण्याची नामुष्की ओढवली.

१२०५२ क्र.ची सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस बुधवारी नेहमीप्रमाणे सीएसएमटी स्थानकातून सुटली. या एक्स्प्रेसला डीएल-१ हा डबाच जोडला गेला नाही. यामुळे एक्स्प्रेसच्या प्रतीक्षेतील प्रवाशांचा गोंधळ उडाला. डीएल-१ डबा हा राखीव, विनावातानुकूलित डबा असून त्याला जोडून सामानाचा डबा होता. एक्स्प्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रवाशांनी तिकिट तपासणीसाला जाब विचारल्यानंतर तो अनुत्तरित झाला. या तपासणीसाने प्रवाशांना इतर डब्यात बसून प्रवास करण्याची मुभा दिली. डीएल-१ डब्यात ३५हून अधिक प्रवासी होते. मात्र हा डबाच जोडला न गेल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. याबाबत प्रवाशांनीही रेल्वे प्रशासनाकडे रितसर तक्रारही नोंदवली. काही तांत्रिक अडचणीमुळे डीएल-१ डबा जोडला गेला नसल्याचे स्पष्टीकरण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले.