रत्नागिरी:- आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर कॉलिंग सेंटर प्रकरणातील काही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सिप ट्रंकिंग सिस्टीम व संगणकाचा वापर करुन मस्कत, कतार, सौदी, कुवेत, ओमान आदी आखाती देशातून रत्नागिरी कॉल आल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र संशयित तपासात सहकार्य करत नसून पोलिसांना खोटी माहिती देत आहेत. बांद्रामधील सर्व्हरच्या ठिकाणाचा पत्ताही खोटा असल्याचे चौकशीत पुढे आले. संशयितांना न्यायालयात हजर केले असता दोघांच्या पोलिस कोठडीत 4 दिवसाची वाढ करण्यात आली आहे.
अलंकार अरविंद विचारे (वय 38, रा. शाळीग्राम, छत्रपतीनगर, रत्नागिरी), फैसलरझा अलिरझा सिद्धिकी (वय 33, पंचमुखी हनुमान मंदिर, पनवेल नवी मुंबई) अशी संशयितांची नावे असून तिसरा आर्शद नवाझ अजून फरार आहे. ही घटना जून ते 12 ऑगस्ट यावेळी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयितांकडून विचारे यांच्या मोबाईल शॉपीमध्ये जिओ कंपनीच्या सिप ट्रंकीग सिस्टीम संगणकाचा बेकायदेशीर वापर केला जात होता. ग्राहकांना डोमेस्टीक तसेच इंटर नॅशनल कॉल करण्याची सेवा अवैधरित्या पुरवून शासनाची फसवणूक केली जात होती. या सेंटरवरून पाकिस्तानसह अन्य देशांमध्ये कॉल झाले असण्याच्या शक्यतेवरून सर्व बाजूनी तपास सुरू आहे.
या प्रकरणातील आणखी माहिती तपासात पुढे येण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या तपासात संशयित फैसल सिद्धीकी याने सांगितलेल्या भारत नगर बांद्रा-मुंबई येथील ऑफिसची झडती घेण्यात आली मात्र त्या ठिकाणी कॅपिटल ओशियन इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनांन्शिल सोलुशन्स नावाचे शेअर मार्केंटचे ऑफिस आहे. पोलिसांनी पंचनामा केला आहे. संशयित सिद्धीकी हा मीरा रोड येथे राहत असल्याची माहिती मिळाली. परंतु खात्री करण्यास पोलिस गेले असता त्याचे घर बंद आढळले. तसेच पनवेल येथील त्याच्या कुटुंबीयानी तो घरात राहत नसल्याचे सांगितले. त्यामुळे संशयित खोटी माहिती देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच संशयित मित्राचा मोबाईल नंबर वापरत असल्याची सीडीआर आधारे तपासात स्पष्ट झाले.
रजिस्ट्रेशनसाठी स्टॅम्प, स्वाक्षरी बनावट
गुन्ह्यातील दोन्ही संशयितांकडून सिप ट्रंक कॉल इंटरनेटद्वारे कोणत्या पद्धतीने केले. त्यासाठी त्यांनी कोणती साधने व व्यक्तींचा वापर केला, ती ठिकाणी कोणती याबाबतची माहिती संशयितांकडून मिळत नसल्याने तपासात अडथळा निर्माण झाला आहे. तिसरा संशयिताच्या वास्तव्याबाबत कोणतीही माहिती पुढे येत नाही. तसेच जिओ कंपनीचे सीप ट्रंकीग सिस्टीम करीता करण्यात आलेल्या रजिस्ट्रेशन फॉर्मवर असलेल्या स्टॅम्प व त्यावरील स्वाक्षरी ही संशयितांची नसल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यावर स्वाक्षरी कोणाची यांचा तपास सुरू आहे. दुसरा संशयित कॉल सेंटर चालवत होता असे सांगत आहे. मात्र त्या ठिकाणी कोणते लोक नेमले होते हे स्पष्ट होत नाही. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.









