Sunday, May 3, 2026
spot_img
Home गुन्हेगारी नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरीमध्ये १३ लाखांची फसवणूक

नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरीमध्ये १३ लाखांची फसवणूक

क्यूआर कोड बदलून ग्राहकांकडून परस्पर उकळली रक्कम

चिपळूण:- शहरातील ‘नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी’ शाखेत बनावट बिल बुक आणि स्वतःचा क्यूआर कोड वापरून तब्बल १३ लाख १६ हजार ५८७ रुपयांचा अपहार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोन संशयितांविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​हा अपहार सन २०२२ पासून १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुमित संजय शिंदे (रा. कोढे शिंदेवाडी, चिपळूण) याने ज्वेलरी शॉपमध्ये काम करत असताना स्वतःचे एक खाजगी (बनावट) बिल बुक तयार केले होते. या बिल बुकवर त्याने आरोपी क्रमांक २ सिमयंती गणेश तांबीटकर हिच्या सह्या घेऊन ते अधिकृत असल्याचे भासवले.

​सुमित शिंदे याने दुकानातील दागिने ग्राहकांना विकताना अधिकृत बिलाऐवजी स्वतःच्या खाजगी बिल बुकचा वापर केला. पैशांच्या व्यवहारासाठी त्याने दुकानाचा क्यूआर कोड न वापरता स्वतःचा वैयक्तिक क्यूआर कोड तयार केला होता. ग्राहकांना तोच कोड स्कॅन करायला लावून त्याने विक्रीची रक्कम थेट स्वतःच्या बँक खात्यात वळवून घेतली. तसेच काही ग्राहकांकडून रोख रक्कम स्वीकारून ती दुकानाच्या हिशोबात जमा न करता स्वतःकडेच ठेवून घेतली.
​अशा प्रकारे सुमारे तीन वर्षांच्या कालावधीत संशयितांनी संगनमत करून एकूण १३ लाख १६ हजार ५८७ रुपयांची फसवणूक केली आहे.

​याप्रकरणी नक्षत्र ज्वेलरीचे हेड मॅनेजर महेंद्र मधुकर शिंदे (वय ३३, रा. रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून ९ मार्च रोजी रात्री उशिरा चिपळूण पोलिसांनी सुमित शिंदे आणि सिमयंती तांबीटकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या मोठ्या आर्थिक अपहारामुळे चिपळूणच्या व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अपहार केलेली रक्कम हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.