Sunday, May 3, 2026
spot_img
Home गुन्हेगारी सुप्रिया लाईफ सायन्सच्या ‘एचआर’ मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी

सुप्रिया लाईफ सायन्सच्या ‘एचआर’ मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी

पिरलोटे येथील तरुणावर गुन्हा दाखल

खेड:- चिपळूण-खेड औद्योगिक पट्ट्यातील लोटे परशुराम येथील ‘सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड’ कंपनीत अनधिकृतपणे प्रवेश करून कंपनीच्या एचआर मॅनेजरला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​७ मार्च रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास लोटे गावाची गावदेवीची पालखी परंपरेप्रमाणे सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीच्या आवारात आली होती. यावेळी संशयित आरोपी शैलेश शिवाजी चाळके (रा. पिरलोटे दत्तवाडी, ता. खेड) याने कोणत्याही परवानगीशिवाय आणि अपराधाच्या उद्देशाने कंपनीच्या गेटमधून आत प्रवेश केला.

​कंपनीच्या आवारात आल्यानंतर संशयिताने कंपनीचे एचआर मॅनेजर मनोज दिगंबर भामरे (वय ५०) यांना गाठले. त्यांना कसलाही विचार न करता अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संशयित इतक्यावरच थांबला नाही, तर तो फिर्यादींच्या अंगावर धावून गेला आणि त्यांना ‘जीवे ठार मारण्याची’ धमकी दिली.

​या घटनेनंतर मनोज भामरे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता आरोपी शैलेश चाळके याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या ​कलम १३१, ​कलम ३३२ (सी), ​कलम ३५१ (३) व ३५२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत. औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारे अधिकाऱ्याला धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.