राजापूर:- तालुक्यातील परुळे (जुवेवाडी) येथे वडिलाोपार्जित घराच्या वादातून पुतण्याने आपल्या चुलत्यावर स्टीलच्या बाटलीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी एका तरुणासह तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्याम मुरलीधर सावंत (वय ५८, सध्या रा. कुर्ला, मुंबई; मूळ रा. परुळे जुवेवाडी) आणि आरोपी हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक (चुलते-पुतणे) आहेत. त्यांच्यामध्ये वडिलाोपार्जित घरावरून जुना वाद असून त्याबाबत न्यायालयात केस सुरू आहे. ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास श्याम सावंत, त्यांच्या पत्नी संगिता आणि लहान भाऊ सुदाम हे आपल्या परुळे येथील मूळ घरी आले होते.
यावेळी घरात राहणारा पुतण्या दिपक श्रीराम सावंत (वय ३५) आणि घरातील तीन महिलांनी कोर्टातील वादाचा राग मनात धरून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मारण्यासाठी अंगावर धावून गेले.
या वादादरम्यान आरोपी दिपक सावंत याने घरातील स्टीलची बाटली घेऊन फिर्यादी श्याम सावंत यांच्या डाव्या गालावर जोरात मारून त्यांना दुखापत केली. तसेच सर्वांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून ‘बघून घेण्याची’ धमकी दिली. या हल्ल्यात श्याम सावंत जखमी झाले आहेत.
याप्रकरणी श्याम सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी ९ मार्च रोजी मध्यरात्री १:३९ वाजता आरोपी दिपक श्रीराम सावंत आणि तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ३५१(१), ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.









