ठेकेदाराविरुद्ध गुन्हा; निविदा कागदपत्राची पीडीएफ फाईल एडिट करून दुसऱ्या निविदेसाठी वापरली
रत्नागिरी:- महावितरणच्या परिमंडळ कार्यालयात नोंदविण्यात आलेल्या निविदेच्या कागदपत्रात फेरफार करून ते दुसऱ्या निविदेसाठी वापरल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्र तयार करून त्याचा वापर केल्याचा आरोप असून, या प्रकरणामुळे महावितरणच्या निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत कार्यकारी अभियंता अनुराधा सुरेशराव आंधनसरे (वय ४५, मूळ रा. नाशिक, सध्या रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून संशयित अतुल शिवाजी बेले (रा. सैनिकनगर पूर्व, वानलेसवाडी, मिरज, जि. सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरण परिमंडळ कार्यालय, नाचणे रोड, रत्नागिरी येथे २७ डिसेंबर २०२५ ते १६ एप्रिल २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी १ सप्टेंबर २०२६ ला दुपारी १२ वाजता रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयित अतुल बेले यांनी यापूर्वी महावितरणच्या EEC/RTN/eT-33/2025-26 या निविदेसाठी वापरलेल्या ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची पीडीएफ फाईल एडिट केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याची प्रिंट काढून त्यावर नमूद असलेल्या निविदेचा मजकूर बदलण्यात आला. संबंधित कागदपत्राचा वापर करून निविदा मिळविण्यासाठी तसेच फिर्यादीची दिशाभूल करण्यासाठी हे कृत्य केल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. तसेच, याच कागदपत्राचा EEC/RTN/eT-36/2025-26 या दुसऱ्या निविदेसाठी ‘डिक्लेरेशन बॉन्ड’ म्हणून महावितरणच्या संकेतस्थळावर वापर करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेत सादर करण्यात आलेल्या कागदपत्राच्या सत्यतेबाबत संशय निर्माण झाला असून, संबंधित प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१८(२), ३३६(२), ३३६(३) आणि ३४०(२) तसेच भादंवि कलम ४१७, ४६५, ४६८ आणि ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्र तयार करणे, त्याचा खरा म्हणून वापर करणे आणि फसवणुकीशी संबंधित बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. निविदा प्रक्रियेत कागदपत्रांची छेडछाड करून त्यांचा वापर झाल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाच्या तपासाकडे महावितरणसह संबंधित ठेकेदारांचेही लक्ष लागले आहे. पोलिस तपासात बनावट कागदपत्र तयार करण्यामागील उद्देश, त्याचा वापर नेमका कसा करण्यात आला आणि या प्रक्रियेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.









