राजापूर ताम्हाणे, ताम्हणकरवाडी येथील घटना
राजापूर:- तालुक्यातील ताम्हाणे, ताम्हणकरवाडी येथे २०१५ पासून सुरू असलेल्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सरिता संजय ताम्हणकर (वय ५२, रा. ताम्हाणे, ताम्हणकरवाडी) यांनी फिर्यादी दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी आरोपी नामदेव गोविंद ताम्हणकर (वय ५६), अनिता नामदेव ताम्हणकर (वय ५०), मनोहर सोमा ताम्हणकर (वय ६८), मनिषा मनोहर ताम्हणकर (वय ६३), विशाल मनोहर ताम्हणकर (वय ३९) आणि सागर मनोहर ताम्हणकर (वय ३७, सर्व रा. ताम्हाणे, ता. राजापूर) यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०८, ३(५) तसेच भा.द.वि.क. ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१५ मध्ये आरोपींचा मुलगा प्रथमेश मयत झाला होता. हा मृत्यू फिर्यादीचे पती संजय गोविंद ताम्हणकर यांनी केलेल्या देवदेवस्कीमुळेच झाला आहे, असा संशय घेऊन आरोपी मागील १० वर्षांपासून त्यांना सतत टोचून बोलत व शिवीगाळ करून मानसिक त्रास देत होते. तसेच, जमीनीच्या वादातून फिर्यादी यांच्या पतीसह त्यांची मुलगी प्रियांका आणि मुलगा साहिल यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच सततच्या त्रासामुळे व वादातून फिर्यादी यांच्या पतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.









