तोतया अधिकाऱ्याचा फसवणुकीचा डाव उघड
चिपळूण:- अन्न व औषध प्रशासन विभागाचा बनावट फूड इन्स्पेक्टर बनून कारवाईची धाक दाखवत हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार चिपळूण शहरात समोर आला आहे. येथील महालक्ष्मी चायनीज सेंटरचे चालक रणवीर सावंत यांना गुरुवारी संदीप शिंदे नावाच्या अज्ञात व्यक्तीने फोन करून स्वतःची ओळख अन्न सुरक्षा विभागाचा अधिकारी अशी करून दिली. हॉटेलचे आवश्यक परवाने आणि कामगारांचे वैद्यकीय तपासणी अहवाल नसल्याचा आक्षेप घेत, दुकान सलग २४ दिवसांसाठी तात्काळ सील करण्यात येईल आणि न्यायालयात ६५ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला जाईल, अशी थेट भीती संबंधिताने घातली. या कारवाईच्या भीतीपोटी व्यावसायिकाने तोडगा विचारताच कारवाई टाळण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी करून व्हॉट्सॲपवर स्कॅनर पाठवून पैसे ऑनलाइन पाठवण्याचा दबाव या तोतयाने आणला.
या संशयास्पद संभाषणाबाबत रणवीर सावंत यांनी तत्काळ माजी नगरसेवक तथा हॉटेल व्यावसायिक संजय तांबडे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. फोनवरील संशयास्पद बोलणे आणि कारवाईची विसंगत पद्धत लक्षात आल्यानंतर तांबडे यांनी अन्न सुरक्षा विभागाचे अधिकृत अधिकारी परदेशी यांच्याशी संपर्क साधून खातरजमा केली असता, संबंधित नावाची कोणतीही व्यक्ती या विभागात कार्यरत नसल्याचे उघडकीस आले. हा फसवणुकीचा प्रकार वेळीच उघडकीस आल्याने व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक टळली असली, तरी या घटनेच्या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि हॉटेल चालकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा प्रकारे तोतया अधिकाऱ्यांचे फोन आल्यास व्यावसायिकांनी कोणत्याही दबावाला किंवा भीतीला बळी न पडता थेट अधिकृत शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा आणि परस्पर संवाद साधून माहितीची खात्री करावी, असे आवाहन संजय तांबडे यांनी केले आहे.









