Saturday, July 11, 2026
spot_img
Home गुन्हेगारी फरार गुटखा माफियाला चिपळूणमधून ठोकल्या बेड्या

फरार गुटखा माफियाला चिपळूणमधून ठोकल्या बेड्या

संगमेश्वर पोलिसांची मोठी कारवाई

संगमेश्वर:- गेल्या दीड महिन्यांपासून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून पळणाऱ्या एका सराईत अवैध गुटखा व्यावसायिकाचा खेळ अखेर संपला आहे. संगमेश्वर पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून या गुटखा किंगला चिपळूणमधून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असून, संगमेश्वर पोलिसांवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या मोठ्या कारवाईची सुरुवात २६ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास झाली होती. संगमेश्वर येथील पारेख पेट्रोल पंपाजवळ एक वॅगनार कार (क्र. एम.एच.१४ बी.के. ४१२०) संशयास्पद स्थितीत उभी असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी या गाडीतून शासनाने प्रतिबंधित केलेला लाखो रुपयांचा गुटखा विक्रीसाठी घेऊन जात होता. मात्र, नियतीचा खेळ असा की ऐनवेळी गाडीत तांत्रिक बिघाड झाला. ‘आता खाकी वर्दी आपल्यापर्यंत पोहोचणार’ या भीतीने आरोपीने कार जागच्या जागी लॉक केली आणि अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला.

त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिसांनी जेव्हा गाडीची झडती घेतली, तेव्हा पोलिसांना गाडीत तब्बल ५ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू कोंबून भरलेला आढळला.

याप्रकरणी कार मालक फारुक कच्ची (रा. आंबेड खुर्द, संगमेश्वर) व मोहम्मद यासिन उमर फारुक पठाण (रा. मुचरी, संगमेश्वर) यांच्याविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आपला काळा धंदा पकडला गेल्याचे समजताच दोन्ही आरोपी पसार झाले झाले. पोलीस पाठीवर आहेत हे माहीत असल्याने ते सतत आपले ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत होते. आरोपींना वाटत होते की आपण पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी झालो, पण त्यांना माहीत नव्हते की कायद्याचे हात किती लांब असतात!

संगमेश्वर पोलिसांचे गुप्तहेर आणि तांत्रिक शाखा आरोपींच्या प्रत्येक हालचालीवर पडद्यामागून नजर ठेवून होती. अखेर ९ जुलै २०२६ रोजी पोलिसांना पक्की माहिती मिळाली की मुख्य आरोपी फारुक अल्लारखॉ कच्ची हा चिपळूण परिसरात लपून बसला आहे. कसलाही वेळ न घालवता संगमेश्वर पोलिसांच्या पथकाने चिपळूण गाठले आणि वेढा आवळून आरोपीला जागेवरच झडप घालून ताब्यात घेतले. दीड महिन्यांपासून चाललेला हा लपंडाव पोलिसांनी एका झटक्यात संपवला.

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक मा. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक मा. बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र पालवे यांच्या थेट देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रवीण देसाई, पोहेकॉ मनवल आणि पोकॉ आटोळे यांच्या पथकाने ही धाडसी मोहीम फत्ते केली. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो कायद्याच्या तावडीतून सुटू शकत नाही, हे दाखवून देणाऱ्या संगमेश्वर पोलिसांचे संपूर्ण जिल्ह्यातून जाहीर कौतुक होत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई करत आहेत.