रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात एका अल्पवयीन बालिकेचा विनयभंग आणि लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. आरोपी सफीउल्ला समीर सोलकर (वय २४, रा. कोकण नगर, रत्नागिरी) याला ३ वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
ही घटना मारुती मंदिर परिसरात घडली होती. पीडित बालिका आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना आरोपी सफीउल्ला याने तिला रस्त्यात अडवले. तिच्या गळ्यात हात घालून ओढत नेले आणि “तू माझ्यावर प्रेम करतेस का?” अशी विचारणा करत तिचा विनयभंग केला. पीडितेने तिथून जाण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने पुन्हा तिचा हात धरला आणि तिला जबरदस्तीने गाडीवर बसण्यास सांगितले.
या खटल्यात विशेष सरकारी वकील सौ. मेघना सुहास नलावडे यांनी सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली. खटल्यादरम्यान एकूण १२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या, ज्या आरोपीला शिक्षा मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या.
या गुन्ह्याचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मुक्ता भोसले यांनी केला होता. तसेच कोर्ट पैरवी म्हणून श्री. राहुल मोहिते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सुदैवाने, एका अनोळखी व्यक्तीने “काय चाललंय?” असे विचारल्यामुळे आरोपी घाबरला आणि “तुला रात्री न्यायला येतो” असे धमकावून तेथून पसार झाला. पीडितेने तातडीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला आणि रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीस तपासादरम्यान असे समोर आले की, आरोपीने यापूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२१ मध्येही पीडितेचा लैंगिक छळ केला होता. यामुळे पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड विधान संहिता कलम ३७६ (२) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर कलमे वाढवून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. व्ही. वाय. जाधव यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षाने मांडलेला पुरावा आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.









