चिपळूणमध्ये ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
चिपळूण:- पोफळी पवारवाडी-फाटा परिसरात गुरे वाहतूक करणारा टेम्पो सोमवारी रात्री पोलिसांनी पकडला. या टेम्पोमध्ये तब्बल १३ गुरे कोंबून कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येत होती. याप्रकरणी दोघा तरुणांवर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही गुरे लोटे येथील गोशाळेत पाठवण्यात आली आहेत.
पोलिसांनी गुरांसह टेम्पो असा एकूण ९ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. किरण अनिल धनवडे (२८, उस्मानाबाद), अण्णा शिवाजी बंडगर (२३, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल प्रमोद रघुनाथ कदम यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री किरण धनवडे व अण्णा बंडगर या दोघांनी एकमेकांच्या संगनमताने १३ गुरांना टेम्पोच्या मागील बाजूच्या हौद्यात त्यांना वेदना व यातना होतील अशा स्वरुपात दाटीवाटीने आखूड दोरीने बांधले होते. तसेच कत्तलीकरिता किंवा कत्तलीच्या उद्देशाने त्यांची विक्री करण्यासाठी वाहतूक केली जात होती. याबाबतची गोपनीय माहिती अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी पोफळी-पवारवाडी फाटा परिसरात सापळा रचला. गुरे वाहतूक करणारा हा टेम्पो चिपळूण-कराड मार्गावरून पोफळी पवारवाडी फाटा परिसरात येताच या टेम्पोला अडवण्यात आले. यावेळी या टेम्पोची तपासणी करण्यात आली असता हा गुरे वाहतुकीचा प्रकार पुढे आला. संशयित गुरे सोलापूरकडे घेऊन जाणार होते. दोघांना बीएनएसएस नुसार नोटीस देण्यात आली आहे.









