Thursday, October 22, 2026
spot_img
Home गुन्हेगारी उधारीच्या पैशांच्या वादातून मच्छीमारावर हल्ला

उधारीच्या पैशांच्या वादातून मच्छीमारावर हल्ला

रत्नागिरी:- मृत व्यक्तीकडील उधारीचे पैसे मागण्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर कोयती फेकून हल्ला केल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे-कापुसतळी येथे १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

या हल्ल्यात रविंद्र रामा लाकडे (वय ४७, रा. खारवीवाडा, गावडेआंबेरे) यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, आरोपीने त्यांच्या उजव्या गालाचा चावा घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी नितीन बाबल्या डोर्लेकर (रा. गावडेआंबेरे-कापुसतळी) याच्याविरुद्ध पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र लाकडे हे १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आपल्या घरी जात असताना आरोपी नितीन डोर्लेकर याने त्यांच्याकडे मृत रत्नाकांत रामचंद्र नाटेकर यांच्याकडील उधारीच्या पैशांची मागणी केली. त्यावर लाकडे यांनी संबंधित व्यक्तीचे निधन झाले असून, त्याच्या कार्याच्या दिवशी येऊन उधारीचे पैसे घ्यावेत, असे सांगितले. या बोलण्याचा राग आल्याने आरोपीने आपल्याकडील कोयती लाकडे यांच्या दिशेने फेकून मारली. ही कोयती त्यांच्या डोक्याला लागल्याने त्यांना दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने धावत येऊन लाकडे यांच्या उजव्या गालाचा चावा घेतला. तसेच शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी १९ ऑक्टोबर रोजी पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावडेआंबेरे परिसरात चर्चा सुरू आहे.