Thursday, October 22, 2026
spot_img
Home गुन्हेगारी गावडेआंबेरे येथे प्रौढावर दोन दिवसांत दोन गुन्हे दाखल

गावडेआंबेरे येथे प्रौढावर दोन दिवसांत दोन गुन्हे दाखल

उधारीच्या वादातून मारहाण अन् घरात सापडली गावठी दारू

रत्नागिरी:- तालुक्यातील गावडेआंबेरे-कापूसतळी येथे उधारीच्या पैशांच्या वादातून प्रौढाच्या डोक्यात कोयती मारून जखमी करणे आणि बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू बाळगणे, अशा दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांप्रकरणी नितीन बाबल्या डोर्लेकर (रा. कापूसतळी, रत्नागिरी) या एकाच संशयितावर पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता घडली. फिर्यादी रविंद्र रामा लाकडे (४७, रा. गावडेआंबेरे खारवीवाडा) हे आपल्या घरी जात असताना संशयित नितीन डोर्लेकर याने त्यांच्याकडे मयत रत्नकांत नाटेकर यांच्या उधारीच्या पैशांची मागणी केली. यावर ‘रत्नकांत मयत झाला असून त्याच्या कार्याच्या दिवशी येऊन पैसे घेऊन जा’ असे सांगितल्याचा राग आल्याने नितीनने लाकडे यांच्यावर कोयती फेकून मारली. यामध्ये लाकडे यांच्या डोक्याला दुखापत झाली, तसेच संशयिताने धावत जाऊन त्यांच्या उजव्या गालाचा चावा घेत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पूर्णगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.४० वाजता पोलिसांनी याच संशयिताच्या घराच्या अंगणात धाड टाकून दुसरी कारवाई केली. नितीन डोर्लेकर हा राहत्या घराच्या अंगणात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी २१ लिटर गावठी हातभट्टीची दारू बाळगून असताना आढळून आला. पोलिस हवालदार वैभव कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पूर्णगड पोलिस या दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.