संगमेश्वर:- तालुक्यातील लोवले येथून अचानक बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा शोध लागला असून, तो मुंबईत सुखरूप सापडला आहे. त्याचे कोणी अपहरण केलेले नसून, आई-वडील रागावल्याच्या कारणावरून तो कोणालाही न सांगता रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे आता पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चिंतेच्या सावटाखाली असलेल्या त्याच्या कुटुंबीयांसह संपूर्ण तालुक्याने अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
लोवले येथील एका कुटुंबातील १२ वर्षांचा मुलगा ११ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाला होता. रात्रीची वेळ असल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, नातेवाइकांकडे चौकशी केली, मात्र यशचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर त्याचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या पालकांनी संगमेश्वर पोलिस स्थानकात केली.
गुन्हा दाखल झाल्यापासून संगमेश्वर पोलिस या मुलाचा शोध घेत होते. अखेर मुलाचा शोध लागल्याने पोलिसांवरील ताण हलका झाला आहे. मुंबईतून त्याला सुखरूप संगमेश्वर येथे आणल्यानंतर, नियमानुसार बालकल्याण समिती (चिल्ड्रन वेल्फेअर कमिटी) तसेच बाल सुधारगृहाच्या ताब्यात देण्यात आले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, संगमेश्वर पोलिसांच्या उपस्थितीत या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आर. एस. गावित युद्धपातळीवर तपास सुरू केला. पोलिस शोध घेत असतानाच या प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली. घरातून निघालेला हा मुलगा थेट मुंबईत पोहोचला होता. मुंबईत काही दिवस काढल्यानंतर त्याला घराची आणि पालकांची आठवण आली. त्याने वडिलांच्या मोबाइलवर फोन केला आणि आपण मुंबईत सुखरूप असल्याची माहिती दिली. त्याचा फोन येताच वडिलांनी वेळ न घालवता मुंबईतील मुलुंड येथे राहणाऱ्या आपल्या जवळच्या नातेवाइकांशी संपर्क साधला आणि सर्व हकीकत सांगितली. माहिती मिळताच मुलुंड येथील नातेवाइकांनी त्या मुलाने सांगितलेल्या ठिकाणी तत्काळ धाव घेतली आणि त्याला आपल्या ताब्यात घेतले.
त्या मुलाचा प्रवास
घरातून बाहेर पडल्यावर या मुलाने रस्त्यावरून जाणाऱ्या एका अनोळखी दुचाकीस्वाराला हात दाखवून लिफ्ट मागितली आणि तो संगमेश्वरपर्यंत पोहोचला. त्यानंतर संगमेश्वरवरून पुढे जाण्यासाठी त्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकला हात दाखवला. त्या ट्रकने तो खेड येथील लोटे परशराम भागापर्यंत पोहोचला. लोटे येथून पुढे त्याने रेल्वे स्टेशन गाठत रेल्वे पकडली आणि मुंबई गाठली.









