Tuesday, August 25, 2026
spot_img
Home संगमेश्वर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथे पावसाच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याने एका ३९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गणेश गंगाराम शिवगण (वय ३९ वर्षे, रा. आंबेड बुद्रुक, शिगवणवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत गणेश शिवगण हा घरी एकटाच राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी आंबेड बुद्रुक येथील शिगवणवाडी येथील ओढ्यातून घरी ये-जा करत असे. सोमवार, दिनांक ६ जुलै रोजी सायंकाळी ७:३० ते मंगळवार, दिनांक ७ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास, मुसळधार पावसामुळे या ओढ्याला मोठा पूर आला होता. या पाण्याच्या जोरदार प्रवाहात गणेश वाहून गेला. आंबेड बुद्रुक ते सोनगिरी दरम्यान असलेल्या चिनामिना पुलाखालील मोरीतून जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात त्याचा मृतदेह आढळून आला.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही.व्ही.मनवल हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. मयताचा शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.या घटनेमुळे आंबेड बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.