Friday, May 22, 2026
spot_img
Home संगमेश्वर आंबा घाटात एसटी- एर्टिका कारची भीषण धडक; ५ जण जखमी

आंबा घाटात एसटी- एर्टिका कारची भीषण धडक; ५ जण जखमी

साखरपा:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटातील दख्खन बस थांब्याजवळ गुरुवारी सकाळी एसटी बस आणि एर्टिका कार यांच्यात भीषण समोरासमोर धडक होऊन पाच जण जखमी झाले. ही घटना सकाळी सुमारे ९.४० वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद भिकाजी शिंदे (वय ५०, रा. भडकंबा) हे आपल्या ताब्यातील एसटी बस (एमएच १४ बीटी २७५३) खडीकोळवण ते साखरपा मार्गावर घेऊन जात होते. आंबा घाटातील दक्खन बस थांब्याजवळ बस पोहोचली असता समोरून येणारी एर्टिका कार (एमएच ११ डीझेड ०३२९) आणि एसटी बस यांच्यात जोरदार धडक झाली. एर्टिका चालक संतोष शिवाजी पवार (वय ५०, रा. रामनगर, सातारा) हे रत्नागिरीहून साताऱ्याकडे जात होते.

या अपघातात एसटी चालक प्रल्हाद शिंदे, एसटी प्रवासी संजय तुकाराम शितप (वय ५८, रा. खडीकोळवण), एर्टिका चालक संतोष पवार, शंभुराज शिवाजी पवार (वय १३, रा. रामनगर, सातारा) तसेच श्रीकांत लक्ष्मण मानपुरी (वय २७, रा. भिवंडी, ठाणे) हे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले. सर्व जखमींना साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार करण्यात आले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, पोलीस फौंजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश सुतार, महिला हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, कॉन्स्टेबल तानाजी पाटील, महिला कॉन्स्टेबल रेश्मा चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तत्काळ वाहतूक सुरळीत करत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.