संगमेश्वर:- मुंबई येथे जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका तरुणाचा रेल्वे स्थानकावर धावती ट्रेन पकडताना झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. गुरुवार दि २ जुलै रोजी सावंतवाडी-दिवा पॅसेंजरमध्ये चढत असताना अचानक पाय घसरून फलाट आणि धावत्या गाडीच्या मधल्या पोकळीत कोसळल्याने अनिल बाळू बांबाडे (वय ३३, रा. शेंबवणे गोमाणेवाडी, ता. संगमेश्वर) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
रेल्वे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस आली होती. मुंबईच्या दिशेने नोकरीसाठी निघालेला अनिल बांबाडे हा या गाडीत चढत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट फलाट व गाडीच्या मधील अरुंद जागेत पडला. हा थरार पाहून स्थानकावरील प्रवाशांच्या अक्षरशः काळजाचा ठोका चुकला.
अपघात घडताच रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई बुरकुले यांनी अत्यंत तत्परता दाखवली. त्यांनी तात्काळ स्टेशन मास्तर यांच्याकडून लेखी मेमो घेऊन, वेळ न दवडता एका खाजगी रिक्षाच्या सहाय्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनिलला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र गंभीर दुखापतीमुळे दुपारी ३.४० वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नवघरे यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेऊन मृतदेहाचा इनक्वेस्ट पंचनामा केला. अनिल हा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. त्याच्या अचानक जाण्याने बांबाडे कुटुंबाचा मोठा आधार हिरावला गेला आहे.
या घटनेप्रकरणी रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर अनिलचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या हृदयद्रावक घटनेमुळे शेंबवणे गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









