Sunday, July 19, 2026
spot_img
Home संगमेश्वर सायले येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

सायले येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील सायले माईनवाडीतील सार्वजनिक विहिरीत बिबट्या पडल्याची घटना गुरूवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. या बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्याच्या सहाय्याने विहिरीबाहेर काढत त्याला जीवदान दिले. या बिबट्याला वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे.

याबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायले माईनवाडी या ठिकाणी रात्री १०.०० वाजता सार्वजनिक विहिरीमध्ये बिबट्या हा वन्य प्राणी पडला असल्याबाबत गावच्या पोलीस पाटील यांनी देवरूख वनविभागाला माहिती दिली. यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे वनपाल सागर गोसावी यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेवून आवश्यक साहित्यासह प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता, सदर विहीर ही सिमेंट कॉंक्रिटची सुमारे २० फुट घेरीची असल्याचे दिसून आले. सदर विहिरीत एक बिबट वन्यप्राणी पडलेला दिसला. सदर बिबट्या हा विहिरीत असलेल्या सिमेंटच्या कठड्यावर आधार घेऊन बसलेला दिसला.

संपूर्ण परिस्थितीची पाहणी करुन लोखंडी पिंजऱ्याला दोरी बांधून पिंजरा विहिरी मध्ये सोडला असता काही क्षणातच बिबट्या पिंजऱ्यामध्ये येऊन सुरक्षित जेरबंद झाला. त्यानंतर सदर बिबट्याची मा.सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघु चिकित्सालय देवरुख यांचे कडून तपासणी करून घेऊन सदर बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. सदरील रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई, मा.सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड, मा परिक्षेत्र वन अधिकारी श्री विक्रम गुरव यांचे मार्गदर्शनाखाली मा वनपाल संगमेश्वर देवरुख श्री सागर गोसावी, वनरक्षक फुणगूस श्री आकाश कडुकर, वनरक्षक आरवली श्री सुरज तेली प्राणी मित्र अनुराग आखाडे यांनी केली. सदरील रेस्क्यू ऑपरेशन करतेवेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते त्यांचेही रेस्क्यू ऑपरेशनसाठी चांगले सहकार्य लाभले. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने मा.परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख श्री सागर गोसावी यांनी केले आहे.