एनडीपीएस कायद्यान्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरातील वर्दळीच्या परिसरापासून काही अंतरावर झाडाच्या आडोशाला बसून गांजासदृश अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या दोघांना रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी (ता. १४) रात्री साडेसातच्या सुमारास फणशी बाग परिसरात करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरातील रिमांड होमच्या पाठीमागील बाजूस असलेल्या फणशी बाग परिसरात एका ठिकाणी झाडाच्या आडोशाला दोघे संशयास्पदरीत्या बसल्याचे आढळून आले. सोमवारी (ता. १४) रात्री सुमारे पावणे आठच्या सुमारास पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता, दोघेही बेकायदेशीररीत्या गांजासदृश अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आले.
पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेतले. त्यांची नावे तौसीफ आसिफ मिरजकर (वय ३८, रा. घर क्रमांक २५६२, राहुल कॉलनी, गवळीवाडा, रत्नागिरी) आणि फैजान निसार हाजू (वय ३०, रा. घर क्रमांक २५६२, राहुल कॉलनी, गवळीवाडा, रत्नागिरी) अशी आहेत. या कारवाईनंतर फिर्यादी भालचंद्र दिलीप मयेकर (वय ४०, रत्नागिरी शहर पोलिस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा क्रमांक ३५४/२०२६ नुसार एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २७ व २९ अन्वये दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.









