Wednesday, September 16, 2026
spot_img
Home गुन्हेगारी संशयास्पद मोटारसायकलसह तरुणाला अटक

संशयास्पद मोटारसायकलसह तरुणाला अटक

चिपळूणमध्ये ५० हजारांची स्प्लेंडर जप्त

चिपळूण:- शहरात देसाई बाजार पाग नाका परिसरात संशयास्पदरीत्या मोटारसायकल चालवणाऱ्या एका तरुणाला चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शैलेश शांताराम वनगे (वय ३६) हे गस्तीवर असताना, देसाई बाजार पाग नाका येथे एक तरुण मोटारसायकल (क्र. एमएच १४ एए २१३१) अत्यंत संशयास्पद स्थितीत चालवताना आढळला.

पोलिसांनी त्यास थांबवून त्याच्या ताब्यातील गाडीच्या मालकी हक्काबाबत व कागदपत्रांबद्दल विचारणा केली. मात्र, तो कोणतीही वैध कागदपत्रे दाखवू शकला नाही तसेच मोटारसायकलच्या मालकीबाबत कोणतेही संतोषजनक स्पष्टीकरण देऊ शकला नाही. विशेष म्हणजे, या गाडीचे चेसीस नंबर आणि इंजिन नंबर देखील दिसून येत नव्हते.

या प्रकरणी पो.कॉ. शैलेश वनगे यांच्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरमान बशीर अहमद शेख (वय १८, सध्या रा. पोलोजी बाग, चिपळूण; मूळ रा. दिहवा सोनी, ता. गोंडा, जि. गोंडा, उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी ५० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल जप्त केली असून, या चोरीच्या किंवा अन्य गुन्ह्यातील संशयास्पद वाहनाबाबत पोलीस उपनिरीक्षक/पोलीस अंमलदार अधिक तपास करत आहेत.