Tuesday, September 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरी काजरघाटी येथे २ किलो गांजासह तस्कराला ठोकल्या बेड्या

रत्नागिरी काजरघाटी येथे २ किलो गांजासह तस्कराला ठोकल्या बेड्या

रत्नागिरी शहर पोलीसांची कारवाई

रत्नागिरी : शहर परिसरात अमली पदार्थांची तस्करी व विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान काजरघाटी धार परिसरात एका संशयिताला गांजासह ताब्यात घेण्यात आले. रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मंगळवारी सायंकाळी ही कारवाई केली. संशयिताकडून २ किलो १०० ग्रॅम गांजा तसेच दुचाकी असा एकूण १ लाख ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

इम्रान मोहम्मद काझी(रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण पथक काजरघाटी धार भागात नियमित गस्त घालत होते. त्यावेळी शाईन दुचाकी क्रमांक एमएच-०८-बीबी-६७३६ वरून जाणारी व्यक्ती पोलिसांना संशयास्पद वाटली. पोलिसांनी त्याला अडवून विचारपूस केल्यानंतर अंगझडती घेतली. या झडतीमध्ये त्याच्याकडे २ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.

पोलिसांनी गांजा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी ताब्यात घेतली असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ८० हजार ८०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी संशयिताविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी अरांक्षा यादव, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अभिजित थोरात, पोलिस निरीक्षक विवेक पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस कर्मचारी दिपू साळवी, शांताराम झोरे, अमित पालवे, दिनेश आखाडे आणि भालचंद्र मयेकर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.