Monday, November 16, 2026
spot_img
Home रत्नागिरी खालगाव-जाकादेवी येथे झोपेतच एका महिन्याच्या बालकाचा मृत्यू

खालगाव-जाकादेवी येथे झोपेतच एका महिन्याच्या बालकाचा मृत्यू

रत्नागिरी:- अंगावरचे दूध पाजल्यानंतर झोपी गेलेल्या अवघ्या एक महिना सात दिवस वयाच्या बालकाचा श्वास बंद पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खालगाव-जाकादेवी येथे घडली आहे. शौर्य रोहन गोसावी असे मृत बालकाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खालगाव-जाकादेवी येथील रहिवासी सौ. अश्विनी रोहन गोसावी या आपल्या एक महिना सात दिवसांच्या शौर्य या मुलासोबत घरी होत्या. रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शौर्य झोपेतून उठून रडू लागल्याने आई अश्विनी यांनी त्याला झोपून अंगावरचे दूध पाजले. दूध प्यायल्यानंतर शौर्य पुन्हा झोपी गेला, तसेच त्याच्या बाजूला आईलाही झोप लागली.
सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अश्विनी यांना जाग आल्यानंतर त्यांनी शौर्यला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नसल्याचे आणि तो श्वास घेत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ही बाब घरातील नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर शौर्यचे आजोबा बापू चंद्र गोसावी व इतर नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी तातडीने तरवळ येथील खाजगी रुग्णालयात, त्यानंतर खेडशी आणि रत्नागिरी शहरातील अन्य दोन खाजगी रुग्णालयांत नेले.

अखेर अधिक उपचारासाठी त्याला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून सकाळी ८.२० वाजण्याच्या सुमारास त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी आई अश्विनी गोसावी यांनी दिलेल्या खबरीवरून रत्नागिरी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची (क्रमांक १०४/२०२६) नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.