Friday, September 4, 2026
spot_img
Home रत्नागिरी अतिक्रमण हटाव मोहिमेला दोन दिवसांनी पुन्हा गती

अतिक्रमण हटाव मोहिमेला दोन दिवसांनी पुन्हा गती

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने हाती घेतलेली ‘अतिक्रमण हटाव मोहीम’ अधिक तीव्र केली आहे. गेल्या चार दिवसांत प्रशासनाने जोरदार कारवाई करत रस्त रहदारीला अडथळा ठरणार्या सुमारे १३ ते १४ मुख्य टपऱ्या आणि अनधिकृत बांधकामे हटवली आहेत. मात्र, वरच्या भागातील कारवाईदरम्यान ‘हातावर पोट’ असलेल्या लहान व्यावसायिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी नगर परिषदेने त्यांच्या योग्य पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मोहिमेला दोन दिवसांचा ब्रेक देण्यात आला असून, त्यानंतर ही मोहीम शहराच्या खालील भागात हाती घेण्यात येणार आहे.

नगर परिषदेच्या या धडक मोहिमेमुळे शहरातील अनधिकृत टपऱ्या, पदपथांवरील स्टॉल्स आणि बेकायदेशीर बांधकामे उभारणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

शहरातील वाहतूक कोंडी दूर करणे आणि पादचाऱ्यांसाठी रस्ते मोकळे करणे या मुख्य उद्देशाने ही कारवाई राबवली जात आहे. मारुती मंदिर, मुख्य बाजारपेठ आणि एसटी स्थानक परिसर यांसारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी नगर परिषदेच्या विशेष पथकाने जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत अतिक्रमणे हटवून रस्ते व पदपथ खुले केले. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिक आणि वाहनधारकांना दररोज भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी ही मोहीम अत्यंत आवश्यक होती, अशा प्रतिक्रिया स्थानिकांमधून व्यक्त होत आहेत.

नगर परिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही मोहीम केवळ चार दिवसांपुरती मर्यादित नसून आगामी काळातही अशीच सुरू राहणार आहे. सार्वजनिक रस्ते, नाले आणि पदपथांवर पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच संबंधित साहित्य जप्त केले जाईल, असा सज्जड इशारा प्रशासनाने दिला आहे. व्यापारी व व्यावसायिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहनही नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे.