Monday, November 16, 2026
spot_img
Home रत्नागिरी सोमेश्वर येथे वणव्यात २५ आंब्याची कलमे जळून खाक

सोमेश्वर येथे वणव्यात २५ आंब्याची कलमे जळून खाक

रत्नागिरी:- शहरालगतच्या सोमेश्वर सडा परिसरातील सुक्या गवताला शुक्रवारी दुपारी अचानक लागलेल्या वणव्याने रौद्र रूप धारण केल्याने स्थानिक बागायतदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रणरणते ऊन आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाळांनी वेगाने फैलाव घेत लगतच्या आंबा बागांना विळखा घातला. या आगीत स्थानिक बागायतदार करीम हुसेन काझी यांच्या बागेतील तब्बल २५ आंब्याची कलमे जळून पूर्णपणे खाक झाली आहेत.

शुक्रवारी दुपारी सोमेश्वर सड्यावरील सुक्या गवताने अचानक पेट घेतला. उन्हाचा कडाका आणि वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काही वेळातच वणव्याने भयावह रूप घेतले आणि आगीच्या ज्वाळा थेट शेजारील बागांपर्यंत पोहोचल्या. यामुळे परिसरात काही काळ मोठी घबराट आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ऐन आंबा हंगामाच्या पूर्वतयारीच्या काळात लागलेल्या या आगीत करीम काझी यांची २५ कलमे भस्मसात झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

वणवा लागल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्याचबरोबर रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी शुभम झगडे, संकेत कांबळे आणि वाहनचालक राजा कनगुटकर यांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या या संयुक्त तत्परतेमुळे आग वेळीच विझवण्यात यश आले आणि परिसरातील अन्य आंबा बागांचे होणारे संभाव्य मोठे नुकसान टळले.