लांजा येथे कारवाई; ९२ हजार ४१० रुपयांच्या मुद्देमाल जप्त
लांजा:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या लांजा भाजीमार्केट परिसरातील एका गाळ्यात सुरू असलेल्या हायटेक जुगार अड्ड्यावर लांजा पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी धडक कारवाई केली. या धाडसी कारवाईत पोलिसांनी संगणकीय साहित्य, टीव्ही संच, रोकड आणि जुगाराच्या साहित्यासह एकूण ९२ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या प्रकरणी एका संशयिताविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मितेश प्रकाश गावडे (वय ४०, रा. फ्लॅट नं. १०३, एलिना अपार्टमेंट, मधलीवाडी, ऑक्टेल कंपनीसमोर, मिरजोळे, ता. जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मुंबई-गोवा हायवेलगत मुकुंद वडापाव स्टॉलशेजारील भाजीमार्केट भागात असलेल्या मुकुंद भिवा वाघधरे यांच्या मालकीच्या गाळ्यात शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना अनधिकृतपणे जुगार अड्डा चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना पैशांची बाजी लावून ‘फन टार्गेट’ आणि ‘लकी १२ कार्ड’ यांसारखे ऑनलाइन जुगाराचे प्रकार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे महिला पोलीस शिपाई प्रतीक्षा नितेश राणे यांच्या पथकाने ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून दोन ३२ इंची टीव्ही, डेल आणि लेनोव्हा कंपनीचे सीपीयू, दोन इप्सॉन प्रिंटर, एचपी की-बोर्ड, माऊस, दोन बारकोड स्कॅनर, कुलर तसेच जुगाराच्या तीन पावत्या आणि ६ हजार ८१० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ९२ हजार ४१० रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४(१)(अ), ४(१)(क) आणि १२(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास धाकू जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.









