Friday, November 6, 2026
spot_img
Home गुन्हेगारी दापोलीत भरदिवसा कपाटातील पावणेचार लाखांचे दागिने लंपास

दापोलीत भरदिवसा कपाटातील पावणेचार लाखांचे दागिने लंपास

दापोली:-  तालुक्यातील टाळसुरे शेलारवाडी क्रमांक २ येथे भरदिवसा घरफोडीची थरारक घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातून सुमारे ३ लाख ९७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वानऊ ते दुपारी पावणेएकच्या सुमारास घडलेल्या या धाडसी चोरीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

या घटनेबाबत दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार किरण किसन चोगले हे कामानिमित्त खेड येथे गेले होते, तर त्यांची आई घराजवळील परिसरात साफसफाईच्या कामात व्यस्त होती. याच संधीचा गैरफायदा घेत अज्ञात भामट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तिथेच असलेल्या मूळ चावीने शिताफीने उघडून त्यातील लाखो रुपयांचे दागिने पळवून नेले. यामध्ये १० ग्रॅमची सोन्याची चैन, २५ ग्रॅम आणि ४ ग्रॅम वजनाची दोन मंगळसूत्रे, अंगठी, झुमके, कर्णफुले, बाळी आणि कानातील रिंग अशा एकूण मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे.

घरात परतल्यानंतर कपाटाची तपासणी केली असता हा चोरीचा प्रकार चोगले कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. यानंतर त्यांनी तातडीने दापोली पोलीस ठाणे गाठून अधिकृत फिर्याद नोंदवली. चोगले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले असून, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करीत आहेत.