रत्नागिरीत पोलिसांची मोठी कारवाई
रत्नागिरी:- जिल्ह्यात अनैतिक मानवी व्यापार आणि वेश्या व्यवसायाविरुद्ध रत्नागिरी पोलीस दलाने धडक कारवाई सुरू ठेवली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करत पाली येथील “श्रद्धा सबुरी लॉज” वर छापा टाकला आणि वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे.
मंगळवार ११ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली. श्रद्धा सबुरी लॉज, पाली, ता. जि. रत्नागिरी येथे हा छापा टाकण्यात आला. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, पाली येथील श्रद्धा सबुरी लॉजमध्ये बाहेरून महिलांना आणून ग्राहकांमार्फत वेश्या व्यवसाय चालवला जात आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे आणि महिला कक्षाच्या पथकाने पंच व बोगस ग्राहकाच्या मदतीने सदर लॉजवर सापळा रचून यशस्वी छापा टाकला.
छाप्यादरम्यान लॉजमधील एका खोलीतून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. तसेच रोख रक्कम २ हजार, 5 हजार किमतीचा मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संबंधित महिलेने आर्थिक लाभासाठी इतर महिलांना बाहेरील शहरांतून आणि नेपाळमधून रत्नागिरी येथे बोलावून लॉजमध्ये वेश्या व्यवसायासाठी ग्राहक उपलब्ध करून देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या बदल्यात मिळणाऱ्या रकमेतून ती पीडित महिलांना ठराविक हिस्सा देत असे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलिस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे (पोलीस अधीक्षक, रत्नागिरी) व बी.बी. महामुनी, नितीन ढेरे (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा) व श्री. गजेंद्र पालवे (पोलीस निरीक्षक, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे) यांच्यासह शबनम मुजावर (म.सु.क., रत्नागिरी), संदीप ओगले, स्वाती राणे, छाया चौधरी, विजय आंबेकर, गणेश सावंत, अतुल कांबळे यांनी केली.









