Tuesday, November 17, 2026
spot_img
Home गुन्हेगारी वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरात तरुणाचा खून

वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरात तरुणाचा खून

जांभ्या दगडाने ठेचून केले कृत्य; लोटे औद्योगिक वसाहतीतील कामगार कामावर जाताना घातपात

चिपळूण:- तालुक्यातील वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरात मंगळवारी पहाटे एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित तरुणाच्या डोक्यात जांभा दगड घालून त्याचा जीव घेण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, या घटनेमुळे संपूर्ण चिपळूण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. नवनाथ कांबळे असे मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा सांगली जिल्ह्यातील रहिवासी होता.

मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ कांबळे हा वालोपे येथे रेल्वे सेवेत कार्यरत असलेल्या आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्यास होता आणि लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तो कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, मंगळवारी पहाटेच्या सुमारास वालोपे रेल्वे स्टेशन नाका परिसरातील एका टपरीच्या मागे त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात जांभा दगड घालून त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. भरवस्तीच्या आणि वर्दळीच्या स्टेशन नाका परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या हत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून, अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी चिपळूण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.