राजापुरातील सीनएनजी पंपासमोरील घटना : तीन वाहनांना ठोकरले
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर येथील सीएनजी पंपासमोर दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोने तीन – वाहनांना धडक दिल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. हा अपघातग्रस्त टेम्पो घटनास्थळावरून ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढून नेण्याचा प्रयत्न सुरू असताना पोलिसांनी गाडी आणि त्यामधील ३ लाख ४६ हजार रुपयांची गोवा दारू जप्त केली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महिंद्रा पिकअप टेम्पोने राजापुरातील सीएनजी पंपासमोर उभ्या असलेल्या तीन वाहनांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातानंतर परिसरात काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच, राजापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मात्र त्यानंतर अपघातग्रस्त पिकअप टेम्पो ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढत कोदवली येथील साहेबाच्या धरण रस्त्याकडे नेण्यात आला. तेथे वाहनातील दारूचा साठा दुसऱ्या वाहनात हलविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त होताच उपसभापती अभिजीत गुरव यांनी याप्रकरणी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित टेम्पो दारूसह ताब्यात घेतला. मात्र दारूने भरलेल्या वाहनाने अपघात केला असताना ते वाहन पोलीस घटनास्थळी उपस्थित असतानाही तेथून हलविण्यात कसे आले, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. तसेच याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातामध्ये कोणीही जखमी नसल्यामुळे आणि याबाबत कोणाचीही तक्रार नसल्यामुळे पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र अपघातग्रस्त वाहनामध्ये गोवा बनावटीची दारु सापडून आली. अभिजीत गुरव यांच्याकडून याविषयी माहिती मिळताच सिंधुदुर्गातील अपघातग्रस्त टेम्पो आणि इनोव्हा कार ताब्यात घेण्यात आली आहे. तसच ३ लाख ४६ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे यादव यांनी सांगितले.









