Saturday, June 13, 2026
spot_img
Home लांजा लांजा येथे ट्रकमधून ओंडका अंगावर पडून मजुराचा मृत्यू

लांजा येथे ट्रकमधून ओंडका अंगावर पडून मजुराचा मृत्यू

लांजा:- लाकूड तोडण्याचे काम करत असताना ट्रकमधून लाकडी ओंडका डोक्यावर पडून एका ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना लांजा तालुक्यातील भांबेड येथे घडली असून, उपचारादरम्यान रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नामदेव आत्माराम दैत (वय ६५, रा. भांबेड दैतवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नामदेव दैत हे सोमवार, दिनांक ६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास मालक सुनील कानडे यांच्याकडे लाकूड तोडण्याचे काम करत होते. तोडलेली लाकडे ट्रकमध्ये भरत असताना, अचानक एक मोठा लाकडी ओंडका त्यांच्या डोक्यावर कोसळला.

​या अपघातात दैत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मालक सुनील कानडे यांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय, लांजा येथे दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे हलवण्यात आले. सायंकाळी ६ वाजता त्यांना आयसीयू विभागात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच रात्री ७:४५ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

​या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची अधिकृत नोंद ८ एप्रिल रोजी मध्यरात्री करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.