Friday, October 23, 2026
spot_img
Home लांजा अंजनारी पुलावर अपघात; दोन दिवसांत दोन ट्रकचालकांवर गुन्हे

अंजनारी पुलावर अपघात; दोन दिवसांत दोन ट्रकचालकांवर गुन्हे

लांजा:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजाजवळील अंजनारी पुल परिसरात सलग दोन दिवसांत दोन अवजड वाहनांच्या चालकांविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. २१ ऑक्टोबर रोजी आयशर टेम्पो चालकाविरुद्ध, तर २२ ऑक्टोबर रोजी टाटा ट्रक चालकाविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली.

मात्र, या घटनांमुळे केवळ वाहनचालकांच्या निष्काळजीपणाचा मुद्दाच नव्हे, तर अंजनारी पुल परिसरातील महामार्गाची रचना, उतार आणि अवजड वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अपघातानंतर चालकांवर गुन्हे दाखल होतात; पण अपघातांना हातभार लावणारी रस्त्याची संभाव्य त्रुटी असेल, तर तिची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ५.४५ वाजण्याच्या सुमारास प्रेमशंकर शत्रुधन यादव (वय ३४, रा. बेसुंबपुर, ता. हसनगंज, जि. उन्नाव, उत्तर प्रदेश) हा टाटा ट्रक (एमएच ३३ बीपी १९६०) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून जात होता. अंजनारी पुलावर सार्वजनिक रस्त्यावर स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा प्रकारे हयगयीने व बेदरकारपणे वाहन चालविल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई शिवाजी आनंदा कळंत्रे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याच्या एक दिवस आधी, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता अंजनारी पुल परिसरातच आयशर टेम्पो (जीजे १२ बीवाय ९५५८) चालक किशोर विजय महेश्वरी (वय ४५, रा. कोडाई मांडवी, कच्छ, गुजरात) याच्याविरुद्धही बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सार्वजनिक रस्त्यावर स्वतःच्या जीवितास धोका निर्माण होईल, तसेच दुखापत किंवा नुकसान होऊ शकेल, अशा प्रकारे वाहन चालविल्याचा आरोप आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी निधी नितेश आर्डे यांनी फिर्याद दिली. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१ अन्वये २२ ऑक्टोबर रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अंजनारी पुल परिसरातील वारंवार होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणांनी अंजनारी पुल परिसराची तातडीने संयुक्त तांत्रिक पाहणी करण्याची गरज आहे. रस्त्याच्या उताराचे मोजमाप, अवजड वाहनांच्या सुरक्षिततेचा अभ्यास आणि यापूर्वी घडलेल्या अपघातांची कारणमीमांसा करून अहवाल सार्वजनिक करावा. अपघात झाल्यानंतर केवळ पंचनामा व गुन्हा दाखल करण्यापुरती कारवाई न ठेवता, अपघात टाळण्यासाठी रस्त्यातील संभाव्य त्रुटी दूर कराव्यात. वाहनचालकांची जबाबदारी निश्चित करतानाच रस्त्याच्या रचनेचीही निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच वाहनचालकांकडून ठोस मागणी होत आहे.