ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण!
लांजा:- तालुक्यातील साटवली गावातील मुस्लिमवाडी आणि बौद्धवाडी परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने स्थानिक ग्रामस्थांसह शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा तसेच रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावर बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
साटवलीतील मुस्लिमवाडी आणि बौद्धवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली निदर्शनास येत आहेत. विशेषतः दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तसेच रात्रीच्या वेळी बिबट्या मुख्य रस्त्यावर फिरताना दिसत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणारे नागरिक, शेतकरी आणि दुचाकीस्वारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सायंकाळनंतर घराबाहेर पडतानाही नागरिकांना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेळीवर बिबट्याने भरदिवसा हल्ला करून तिला ठार मारल्याची घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. हल्ल्यानंतर बिबट्याने शेळीला जंगलाच्या दिशेने ओढून नेल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, जनावरांना चरण्यासाठी बाहेर घेऊन जाणेही धोकादायक ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या परिसरातील अनेक नागरिक शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहेत. मात्र, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतात जाणे, जनावरांसाठी चारा आणणे तसेच दैनंदिन कामांसाठी घराबाहेर पडताना नागरिकांना भीतीचा सामना करावा लागत आहे. मानवी वस्तीलगतच बिबट्याचा वावर सुरू असल्याने ग्रामस्थांनी विशेष चिंता व्यक्त केली आहे.
या प्रकाराची माहिती लांजा तालुका वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने संबंधित परिसराची तातडीने पाहणी करून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, तसेच आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात वनविभागाने तातडीने पिंजरा लावून त्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करावे, जेणेकरून संभाव्य दुर्घटना टाळता येईल, अशी मागणी साटवलीतील मुस्लिमवाडी, बौद्धवाडी परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे आता साटवली परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.









