रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातून एका ५३ वर्षीय कापड व्यावसायिकाचे अज्ञात इसमांनी अपहरण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सज्जन अमरचंद ओसवाल (वय ५३, रा. घर नं. १९१८, रामआळी, अमरसन्स गारमेंट, रत्नागिरी) असे अपहरित व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी फिर्यादी रोहित सज्जन ओसवाल (वय २७, व्यवसाय कापड व्यवसाय) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अपहरित सज्जन ओसवाल हे गत ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आठवडा बाजार येथील ‘यश ट्रेडर्स’ या दुकानातून चुलतभाऊ निर्मल रमेश ओसवाल यांना भेटण्यासाठी निघाले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत आणि त्यांचा शोध घेऊनही ते कुठेही आढळले नाहीत.
सज्जन ओसवाल यांना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणातून बळजबरीने पळवून नेऊन त्यांचे अपहरण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ९ ऑक्टोबर रोजी रात्री ९:४४ वाजता भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये (जुने कलम भा.द.वि. ३६३ प्रमाणे) अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अज्ञात आरोपींचा आणि अपहरित व्यक्तीचा कसून शोध घेत आहेत.









