Sunday, October 11, 2026
spot_img
Home गुन्हेगारी लांजात शिकारीच्या उद्देशाने बेकायदेशीर बंदूक बाळगणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

लांजात शिकारीच्या उद्देशाने बेकायदेशीर बंदूक बाळगणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

बंदूकीसह जिवंत काडतुसे जप्त

रत्नागिरी:- जंगली श्वापदांची शिकार करण्याच्या उद्देशाने विनापरवाना १२ बोअरची बंदूक आणि जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे. अंजणारी ते शिरंबवली डांबरी रस्त्यावरील ओवलाच दांड परिसरातील झाडीझुडपांमध्ये ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दीपक वसंत पाष्टे (वय ३३, रा. पाष्टेवाडी, अंजणारी, ता. लांजा) आणि सुदर्शन श्रीकांत सावंत (वय ३५, रा. कशेळी नाणिज, ता. जि. रत्नागिरी) या संशयितांविरोधात भारतीय हत्यार कायदा व भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितेश चंद्रकांत आर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास गस्तीदरम्यान संशयित आरोपी अंजणारी-शिरंबवली रस्त्यावरील झाडीत दबा धरून बसलेले आढळले. चौकशी दरम्यान त्यांच्याकडे सुमारे १० हजार रुपये किमतीची एक १२ बोअरची वापरती बंदूक, ४ जिवंत काडतुसे आणि रात्रीच्या वेळी वापरली जाणारी बॅटरी (टॉर्च) असा एकूण १० हजार ९४० रुपयांचा ऐवज बेकायदेशीरपणे बाळगल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला आहे.

प्राथमिक चौकशीत हे दोघेही जंगली प्राण्यांची शिकार करण्याच्या हेतूने तिथे थांबल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियम १९५९ च्या कलम ३(१)/२५ सह भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) नुसार कायदेशीर नोटीस बजावली आहे. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा निश्चित केली असून, पोलीस हवालदार विलास जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.