रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी व चोरीच्या दोन गुन्ह्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. धरम केशव निषाद (वय २२, मूळ रा. किसनपूर, जि. फतेहपूर, उत्तर प्रदेश; सध्या रा. बोईसर, जि. पालघर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९७/२०२२ आणि १९९/२०२२ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम ४५४, ४५७ आणि ३८० अंतर्गत घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये धरम निषाद हा पोलिसांना हवा असलेला आरोपी होता. गेल्या चार वर्षांपासून तो फरार असल्याने त्याचा शोध सुरू होता. अखेर ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेत दोन्ही गुन्ह्यांमध्ये अटक केली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर साळवी, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत बंडबे आणि बाळू गीते यांनी ही कारवाई केली.









