संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथे आज शुक्रवारी सकाळी दोन अवजड ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातग्रस्त वाहनातील क्लिनर जखमी झाला असून त्याला तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही ट्रकांचे मोठे नुकसान झाले असून महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात आज शुक्रवारी सकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. पुण्यावरून रत्नागिरीच्या दिशेने येत असलेला ट्रक (क्रमांक MH 09 EM 7061) मानसकोंड परिसरात आला असता अचानक त्याचे टायर फुटले. चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केला होता. मात्र त्याच दरम्यान मागून मुंबईवरून केरळच्या दिशेने जाणारा भरधाव ट्रक (क्रमांक KL 01 AP 9087) आला. मानसकोंड येथील वळणावर चालकाला रस्त्यालगत उभा असलेला ट्रक वेळेत न दिसल्याने पाठीमागून येणाऱ्या या ट्रकने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या धडकेमध्ये केरळच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा क्लिनर (अफजल , वय 27, केरळ) जखमी झाला. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमीला बाहेर काढले व संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या अपघाताबाबत पोलीस पंचनामा अथवा अधिकृत गुन्ह्याची नोंद करण्याबाबतची प्रक्रिया याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.









