Monday, October 26, 2026
spot_img
Home संगमेश्वर पुर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

पुर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

देवरूख:- अचानक विजेचा जोरदार धक्का बसून बेशुद्ध पडलेल्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी धावून गेलेल्या मुलाचा स्वतः विजेच्या संपर्कात आल्याने मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना संगमेश्वर तालुक्यातील पुर झेपलेवाडी येथे घडली. धिरज रामचंद्र झेपले (वय २७) असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुर झेपलेवाडी येथील रामचंद्र बुधाजी झेपले यांच्या घरातून मागील बाजूस असलेल्या बाथरूममध्ये दिव्यासाठी विद्युत वाहिनी नेण्यात आली होती. ही वाहिनी घराच्या मागील छपराच्या लोखंडी अँगलवरून नेण्यात आली होती. दरम्यान, ही विद्युत वायर कुठेतरी कापली जाऊन तिचा थेट संपर्क लोखंडी अँगलशी आला, ज्यामुळे छपराच्या लोखंडी सांगाड्यात अचानक विद्युत प्रवाह उतरला होता.

शनिवारी सायंकाळच्या सुमारास रामचंद्र झेपले हे आंघोळीसाठी पाणी घेण्याकरिता घराच्या मागील छपरामधून आत जात होते. त्यावेळी नकळत त्यांचा हात विद्युत भारित लोखंडी सळीला लागला. विजेचा तीव्र धक्का बसल्याने ते जागीच बेशुद्ध होऊन खाली कोसळले. वडिलांना अशा अवस्थेत पडलेले पाहून घरात असलेला त्यांचा मुलगा धिरज झेपले हा प्रचंड घाबरून तात्काळ त्यांच्या दिशेने मदतीसाठी धावला. मात्र, घडल्या प्रकाराची कोणतीही कल्पना नसताना धावपळीत धिरजचाही हात त्याच लोखंडी सळीला लागला. क्षणात विजेचा तीव्र धक्का बसल्याने धिरज देखील जागीच बेशुद्ध पडला.

घरातील इतर सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने दोघांनाही विद्युत संपर्कातून बाजूला करत उपचारासाठी तातडीने ग्रामीण रुग्णालय, देवरूख येथे दाखल केले. मात्र, रुग्णालयातील कर्तव्यावर असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती धिरज झेपले याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी तातडीने हालचाल करत नोंद केली असून, आकस्मिक मृत्यूची नोंद (एएमआर क्र. ४६/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये) करण्यात आली आहे.

वडिलांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात कर्तृत्ववान तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याने पुर झेपलेवाडी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून, या घटनेने झेपले कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देवरूख पोलीस करत आहेत.