Friday, November 6, 2026
spot_img
Home संगमेश्वर मुलगा व पत्नीच्या निधनाच्या मानसिक तणावातून लोवले येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

मुलगा व पत्नीच्या निधनाच्या मानसिक तणावातून लोवले येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

संगमेश्वर:- तालुक्यातील लोवले फटकरेवाडी येथे एका ७५ वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. दीड वर्षाच्या अंतराने कर्ता मुलगा आणि पत्नीचे अचानक निधन झाल्याने ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते, त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, लोवले फटकरेवाडी येथील रहिवासी असलेले अनंत यशवंत फटकरे (वय ७५ वर्षे) हे घरात एकटे असताना गुरुवारी सकाळी साडेअकरा ते सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मयत अनंत फटकरे यांचा मुलगा दीड वर्षापूर्वी मरण पावला होता, तर वर्षभरापूर्वी त्यांच्या पत्नीचेही अचानक निधन झाले होते. कुटुंबातील अत्यंत जवळच्या दोन व्यक्तींचा लागोपाठ झालेला विरह त्यांना सहन होत नव्हता. या दुःखातून आणि एकाकीपणातून ते गेल्या काही काळापासून तीव्र मानसिक तणावाखाली वावरत होते.

​गुरुवारी दुपारी मानसिक नैराश्यातून त्यांनी राहत्या घरातील लोखंडी पोलला नायलॉनची दोरी बांधून गळफास लावून घेतला. सायंकाळी कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.

​या दुर्दैवी घटनेबाबत मयत अनंत फटकरे यांच्या कन्या सौ. क्षमा अमित कळंबटे यांनी संगमेश्वर पोलिसांना अधिकृत खबर दिली. त्यांच्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ४४/२०२६ नुसार नोंद करण्यात आली असून, पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.