संगमेश्वर:- तालुक्यातील साडवली येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. वाघजाई मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या ७६ वर्षीय वृद्ध महिलेचा सप्तलिंगी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. अनिता अनंत वाचासिद्ध (वय ७६, रा. सह्याद्रीनगर, साडवली) असे मयत वृद्धेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिता वाचासिद्ध या २७ जून रोजी साडवली येथील वाघजाई मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दरम्यान, त्यांचा मुलगा आशुतोष अनंत वाचासिद्ध हा ग्रामपंचायतीच्या कामासाठी जवळच असलेल्या जाधववाडी परिसरात गेला होता. काम आटोपून परतताना त्याला वेळ असल्याने, त्याने आपली आई मंदिरात आहे की नाही, हे पाहण्यासाठी मंदिराकडे धाव घेतली.
मंदिरात आई दिसून न आल्याने त्याने आजूबाजूला शोध सुरू केला. त्यावेळी मंदिरासमोरील नदीच्या काठी असलेल्या झाडाखाली त्याला आपल्या आईच्या चपला, कमरेचा पट्टा आणि निकॅप दिसून आले. यामुळे त्याला संशय आला आणि त्याने आरडाओरडा करून आईचा शोध सुरू केला.
शोध घेत असताना आशुतोषला आपली आई नदीपात्रातील ‘सप्तलिंगी देवाचा कोंड’ या ठिकाणी पाण्यात तरंगताना दिसली. तातडीने त्याने आजूबाजूच्या लोकांच्या आणि नातेवाईकांच्या मदतीने त्यांना पाण्याबाहेर काढून देवरुख येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद देवरुख पोलीस ठाण्यात (बी.एन.एस.एस कलम १९४ प्रमाणे) करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे









