Thursday, May 7, 2026
spot_img
Home संगमेश्वर तुरळ येथे दोन कारचा अपघात; 7 जण जखमी

तुरळ येथे दोन कारचा अपघात; 7 जण जखमी

संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हरेकरवाडी येथील बस स्टॉपच्या मागे दोन कारचा अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांमधील 7 प्रवासी जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्यात बुधवारी या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

संगमेश्वर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद महादेव जाधव (48, रा. चेंबूर, मुंबई) हे आपल्या ताब्यातील कार घेऊन मुंबईहून राजापूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, तुरळ येथील उतारावर रस्त्याच्या डाव्या बाजूला ह्युंडाई आय-10 कार उभी होती. जाधव यांच्या कारने या उभ्या असलेल्या गाडीला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

प्रसाद महादेव जाधव (48), मानिनी महादेव जाधव (75),​प्रियांका जयसेन जाधव (27), अदिरा जयसेन जाधव (6), तुषार अशोक लोके (50), अशोक रामजी लोके (82),​गार्गी तुषार लोके (45) अशी जखमींची नावे आहेत.​सर्वांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. व्ही. कोष्टी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. साळवी या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.